आगंतुकाची स्वगते

(1 customer review)

 110.00  88.00

गाव खेड्यातील सामान्य माणूस, तिथला निसर्गाधारीत भोवताल, त्या माणसांचे सामाजिक, कौटुंबीक भावजीवन आणि त्याला वेढून असणारे प्रश्नांचे जंजाळ हे डॉ. कैलास दौंड यांच्या मनाला स्पर्शून जाणारे आणि वेळोवेळी अस्वस्थ करणारे विषय आहेत. या अस्वस्थतेतूनच अनेकदा कविता प्रबळ होऊन अवतरतात, शब्दबद्ध होतात. या कवितांच्या निर्मितीनंतर तात्कालिक थोडी उसंत लाभत असली तर अस्वस्थताच अधिक वाढत जाते हे खरे!

500 in stock

पुस्तकाबद्दल

आजच्या काळात कविता उदंड वाढत असली तरी ती लिहिणे देखील तितकेच अपरिहार्य ठरते आहे. ‘आगंतुकाची स्वगते’ मध्ये इ. स. 2012 ते इ.स. 2018 या कालखंडातील कविता समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे या कविता सद्यकाळाचेच रुप घेऊन अवतरलेल्या आहेत.

अधिक माहिती

कवी

डॉ. कैलास दौंड

पाने

96

Publisher

1 review for आगंतुकाची स्वगते

  1. प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार

    • भूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान : आगंतुकाची स्वगते.

    डॉ. चंद्रकांत पोतदार

    अभिव्यक्ती प्रामणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातुन कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते. कवी कैलास दौंड यांची कविता वाचतानाचा अनुभव असाच आहे. उसवत जाणारा गाव आणि बदलत्या जीवनशैलीतलं आपलं जगणं यात एक कोंडी होतेच, गावाचे मुके होत जाणे आणि शहरांनी आपलं शरीर बेढब करून घेणे, मायेच्या नात्यापासून तुटणारे सगळेच संदर्भ कवी कैलास दौंड मांडतात तेव्हा एक जीवघेणा वास्तव अविष्कार त्यांच्या कवितेत व्यक्त होतो. ‘आगंतुकाची स्वगते ‘ ही त्याची महत्त्वाची साक्ष आहे.
    ‘सल आणि ओल ‘ , ‘ नदीकाठ’ आणि ‘ दिस – मास ‘ अशा तीन टप्प्यात ही स्वगते विभागली आहेत. एकत्र कुटूंबपद्धतीला लागणारे सुरूंग, आटत चाललेला मायेचा झरा आणि भावाभावांची खातेफोड या सगळ्यात नात्यांचं बुडणं आणि कोरड्या काळजाची तीव्र वेदना जाणवत राहते. भावांनीच खातेफोड केली आणि बहिणींना बोलावून घेऊन गोड बोलून सह्या घेतल्या. याचे घराघरातले वास्तव कवी मोजक्या शब्दात लिहीतो –
    ‘ कागदावरती मागितल्या सह्या
    नात्याच्या डोहात बुडविल्या वह्या !’
    – खातेफोड, पृष्ठ १२
    कुटुंबाबरोबर गावही उधळतोय चौखूर कारण गावातली मिरवणूक – गल्लीबोळातली अडवणूक, धुंद तरूणाई, उनाड वारं आणि उधाणलेलं पीक, वैर – वाद, गटतट विसरून एक व्हायला हवं, अशी प्रामणिक भावना कवी सांगतो. याच गावाला लुबाडणारा सावकार भेटतो, ढासळत निघालेले बुरूज दिसतात, तर आशेनं जगणारी माणसं जीवही सोडून जातात, याचं विदारक सत्य कवी मांडतो. आशेच्या आधीच मृत्यू गाठावा, पावसाच्या आधीच कुणब्याचं काळीज चोरीला जावं, गुरांच्या छावणीतही कुणी मलिदा खातं, रांगेत राहणारा मात्र उपाशीच राहतो, काळजातली सल मग कुठं मांडायची! असा सगळा व्यापक विचार कृषिपरंपरेतली भूमिका सांगतो. कवीची मातीची नाळ घट्ट आहे पण असा भोवताल सतत छळत राहतो. किती तर्‍हेच्या व्यथा- वंचनेत गुरफटत राहावं, कारण इथं तर सतत काळजीचीच प्रार्थना करत दिवस कंठावे लागतात. हंबरणे हा सुद्धा एक गुन्हा ठरावा , असा हा काळ. आतल्या आत हुंदके देऊन रडत राहावं लागतं, पण नदीतल्या एखाद्या माशांसारखं रडणंही – हुंदके देणंही आतल्या आत दबून जातं. शेतात बांधावरची भांडणं आली, घरा- अंगणाला भिंती आल्या, भावाभावांची – जावाजावांची – गावागावांची भांडणं माणसाला रसातळाला नेऊ लागली. निसर्ग आपल्या लहरीत जगतो आणि गाव आपली नाती तोडतो, अशावेळी मायेचा झराच आटून गेल्याची स्थिती दिसते.
    ‘ पाणी मातीस शोधते
    रूजतांना खोल
    अख्या नदीला मिळेना
    माणसाची ओल ‘
    -ओल, पृष्ठ, २०
    ही केवळ कवीची खंत नाही तर समस्त मानवजातीची खंत आहे. जिथे शेती तिथे उंच इमारती उभ्या राहिल्या, खडकाळ माळरानं कंपन्यांनी काबीज केली, डोळ्यासमोर पैसा नाचतो आणि कूणब्याचा खिसा मात्र रिकामाच राहतो. घोटभर पाण्यासाठी चिमण्यांची धावाधाव, घोटभर पाण्यासाठी दारात तिष्ठणारी तुळस, खुजी झालेली गावं, हद्दपार झालेले गावचे पंच, गावातला खिन्न झाडांचा मुका आक्रोश, वृद्धांच्या समस्यांचा डोंगर, वितुष्टाला जाणारी भावकी या सगळ्यात गावचे हरवलेपण दिसते, पण तरीही मातीशी असणारे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न, हीच खरी मातीची नाळ ‘आगंतुकाची स्वगते ‘ मधील कवितेत व्यक्त होताना दिसते. कितीही शहराचे आक्रमण आपल्या गावखेड्यात झाले तरी मूळ गाव हरवले जाऊ नये ही गावाविषयीची ओढ महत्त्वाची आहे. पण कधीकधी मनालाही बजावून ठेवावंच लागतं, कारण गाव कुठपर्यंत बदलत जाईल याचा कुणालाच अंदाज येत नाही, म्हणून तर स्वीकारावा लागतो गावचा बदल; आणि हे प्रखर वास्तव आहे. कारण बदलत्या वातावरणाची बदलती जीवनशैली खूप महत्वाची आहे. संवेदना बोथट झाल्याचे चित्र मांडताना कवी लिहीतो –
    ‘उधाणाचे पीक रानात घडी घटका मोजताना
    मरण मिठीत, जागल्या दिठीत आक्रसल्या संवेदना
    दु:ख जळून गेले तरीही पूर सरता ओसरेना
    भाकरीही भोगते गा चाकरीची वेदना! ‘
    – खेड्यातल्या मंगलाचे, पृष्ठ, २९
    शेताशिवारातली घटना घरची होते, रान आणि घर एकजीव होतं, पिकं – पानं – फुलं – माती जशी बोलू पाहते तशी घरची माणसंही जिव्हाळ्याची बनतात. काळाच्या कसोटीला पुरून उरावं लागतं, तेव्हा कुठे अस्तित्व शिल्लक राहतं. नाहीतर सभोवतालचा गोतावळा आपला असुनही कसलाच भावबंध – मेळ जुळत नाही. नातवंडासह घराचं गोकुळ झालं म्हणेपर्यंत उंबऱ्याला असंख्य वाटा फुटतात आणि आपल्याच माणसांची पांगापांग होते. नाती विखुरतात तशी काळजातली माणसंही दुरावतात. या संग्रहातील कवितेतून काळाचंही एक व्यापक चित्र उभं राहतं. म्हातारा – म्हातारी जगताना संसार फुलतो पण कधीतरी अचानक म्हातारा गायब होतो, गाव सोडून दूर जातो आणि म्हातारी लांबवर गेलेल्या म्हातार्‍याची वाट तुडवत जगत राहते. जशी कुटुंबाची विस्कटलेली घडी तशी गावाचीही बदलत जाते घडी. एखाद्या बातमीनं माणसं गावजमा होत राहतात. खोलवर अंधार वाढतो, उद्याच्या मृगजळी पुराची स्वप्न पहात माणसं झोपी जातात आणि गाव आकसत राहतो. हे बदलत्या गावाचे, माणसाचे बदलते चित्र वास्तवाला अधोरेखित करत राहते. अशा कितीतरी कविता बदलत्या गावाची, माणसांची, मानवी मनांची कोंडी व्यक्त करतांनाच घुसमट मांडत राहतात. जुन्या जाणत्या, दगडाची गाणी, पडीक वावर, माझे गाणे, या विश्वातील माणसांना, शोधतो मी, हा गाव तुझा नाही, कसे दिवस येतात, सुई – दोरा , मतलबी यासारख्या अनेक कविता याची साक्ष देतात.
    डाॅ. कैलास दौंड यांच्या कवितेतलं सांगणं साधं आहे. गावाची – घराची – माणसांच्या मनाची घडी विस्कटली की मनावर मळभ दाटून येतं, त्याची प्रचिती या कवितेत येते. त्यांच्या साध्या – सोप्या शब्दातलं सांगणं कुठेच आक्रस्ताळेपणाचं रूप घेत नाही. तर जे सांगायचं ते प्रामाणिकपणे कवितेत उतरतं. म्हणूनच त्यांची कविता वाचकमनाला भिडते. दुष्काळी वातावरणातली शेती असो, गावची ओढ असो, पाण्याचा भीषण प्रश्न असो किंवा नात्याचे विखुरलेपण असो, कविता कुठेच भडक बनत नाही. साध्यासरळ पद्धतीने ती व्यक्त होते. अलवार मातीची ओढ, सृजननिर्मितीचा आनंद, झडणारी पाने आणि नव्या पालवीची आशा, दुःख संपले नसले तरीही असणारी जगण्याची उत्कंठा या सगळ्याचेच प्रत्यंतर म्हणजे ‘आगंतुकाची स्वगते’ होत. कवितेतील आशय आणि रूपबंध पाहता ती एकाहून एक व्यक्त होणारी स्वगतेच आहेत. जगण्या – मरण्याच्या अंतराने एक श्वास असतो, मात्र मातीचा सक्त पहारा असतो, म्हणूनच कवीचीच काय, जगण्याविषयीची आस वाढते ती संबंध मानवजातीची. अशाच दीर्घ आशयाची चिंतनशील कविता म्हणजे ‘पक्ष्यांना नसतो धर्म ‘ ही एक कविता होय. स्थलांतर करत फिरणार्‍या पाखरांनी खूप सावधपणे आकाशात भरारी घ्यायला हवी. हे सांगणं खूप आशादायी आहे. वर्तमानाच्या व्यवस्थेत गुरफटलेल्या सामान्य माणसाचे व्यापक जगणे, भोवतालची गर्दी, व्यापक जगणे, माणसांचे मतलबी मनसुबे, गर्दीला तुडवत जाणारी अनोळखी पावलं , कोलाहल आणि सर्वत्र कोलाहलाची काळोखी रात्र, किंचाळणारा आवाज तर कधी गर्दीत हरवून जाणारी अंतर्मनातील आग या सगळ्यातून एक कोलाहलाचे तांडवच वाढत निघाल्याचे भाष्य कवी करतो, ते दुर्दैवाने खरेच आहे. कवीची प्रामणिक मूल्यनिष्ठा कवितेइतकीच खरी आहे. गाव शिवारातल्या एकुण जगण्याला अधोरेखित करतानाच विदारक वास्तवाची जाणीव कवी मांडतो. जगण्याच्या मुशीतुन तावून – सुलाखून निघणारी कविता भवतालाला अधिक संवेदनशीलतेने शब्दात पकडते. निसर्ग – समाज – माणूस -भूमी – गाव या सगळ्यावरचे प्रेम आणि सगळ्यांचे वास्तवरूप पकडण्याची एक हातोटी कवीला सापडली आहे. प्रखर वास्तवता सांगतानाच जगण्यातली खोलवरची अस्वस्थ अगतिकता निर्माण होते, हीच कवितेची श्रेष्ठ जातकुळी आहे. निसटून जाणार्‍या काळाला – भवतालाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करणारी ही कविता आहे. डॉ. कैलास दौंड या कवीचे यासाठीच मनःपूर्वक अभिनंदन!

    • आगंतुकाची स्वगते : कवितासंग्रह
    • कवी : डाॅ. कैलास दौंड
    • प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
    • प्रथमावृत्ती : १२ जानेवारी २०२१
    • पृष्ठे : ९६ • मूल्य : ११०₹
    ~~~
    डाॅ. चंद्रकांत पोतदार
    मराठी विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी
    ता. चंदगड जि. कोल्हापूर 416507
    मोबा. ९४२३२८६४७९

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *