हळवा कोपरा

 250.00  125.00

संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे. ‘पैजेचा विडा’ हा पहिलाच लेख आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. पैज लावून अविश्वसनीय वाटावा असा आहार घेणारे नमुने इथे आपल्याला भेटतात. पंचवीस लाडू साजूक तुपात कालवून खाणारे अनंतराव, दोनशे गरे असणारा फणस एकट्याने फस्त करणारा सीताराम, दही आणि मिरचीच्या जोडीने तब्बल साठ वडे चेपणारे लक्ष्मणराव, उकडीचे एकवीस मोदक स्वाहा करणारे प्रभू असे अनेक अवलिये या लेखात आपल्याला भेटतात. अर्थात तो काळच वेगळा होता. त्या कष्टकरी मंडळींमध्ये हे सारे पचवण्याचे सामर्थ्य होते. आज कोणी असा अचाट उद्योग केलाच तर त्या ताटावरून इस्पितळातील खाटेवरच रवानगी होणार की!
‘लक्ष्मीची गोकर्ण’ ही कथा तर वेगळाच विषय हाताळणारी. मंदाकिनी या फुलवेडीची ही कथा. आपल्या बागेत असंख्य प्रकारची फुलझाडे, त्यात निळ्या – जांभळ्या गोकर्णफुलांची रेलचेल असताना पांढरी गोकर्ण नाही म्हणून खंतावणार्‍या मंदाकिनीला अखेर बर्‍याच प्रतीक्षेनंतर पांढर्‍या गोकर्णीची शेंग मिळते खरी पण खूप प्रतीक्षेनंतर उगवून आलेल्या वेलीला फूल लागायचे काही चिन्ह नव्हते. शेवटी निराश होऊन ती वेल उपटण्यासाठी हात सरसावतो पण…

Buy now Read more