पुस्तकाबद्दल
*अस्सल साहित्याचा नजराणा:
चपराक दिवाळी अंक!*
जुनं ते सोनं
नव खणखणीत नाणं
अस्सल ते आमचं
हेच चपराकचे धोरण…
चपराक! गेल्या काही वर्षात आणि त्यातही कोरोना काळात अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, सुयोग्य नियोजनातून, नि प्रयत्नांची पराकाष्ठा करून देशविदेशातील मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलेला दिवाळी अंक म्हणजे चपराक! एखाद्या दिवाळी अंकाच्या लाखांच्यावर प्रती घरोघरी पोहोचतात ही चपराक परिवारासह मराठी वाचकांसाठी अभिमानाची, गौरवास्पद बाब आहे. यामागे आहे, संपादक घनश्याम पाटील यांची नवनवीन प्रयोग करण्याची दूरदृष्टी, धाडसी निर्णय, अहोरात्र काम करण्याची क्षमता!
यावर्षीचा चपराक दिवाळी अंक मिळाला. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. या अभिमानास्पद बाबीची नोंद घेत संपादक घनश्याम पाटील यांच्या संकल्पनेला कुंचल्याच्या माध्यमातून मू्र्त रुप देऊन मुखपृष्ठ साकारणाऱ्या संतोष घोंगडे यांना सलाम!
या अंकाचे जाणवणारे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या अंकात लेख, कथा, कविता या साहित्य प्रकारांचा समावेश आहे. गतवर्षीच्या अंकात कविता प्रकाशित करायच्या नाहीत या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झालेल्या कविंना यावर्षी मोठा दिलासा मिळाला आहे. आशययुक्त कविता या अंकात वाचायला मिळतात. चपराक अंकाचा खप पाहता या अंकात आपल्या साहित्याला स्थान मिळावे असे साहित्यिकांना वाटणे साहजिकच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक लेखक हे त्यांच्या व्यवस्थापनाच्यावतीने प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकांचे महत्त्वाचे घटक आहेत, काही मान्यवरांचे स्वतःचे ब्लॉग असले तरीही त्यांना आपले साहित्य चपराक अंकात यावे असे वाटणे ही बाब चपराकचे साहित्य क्षेत्रातील स्थान अधोरेखित करते.
संपन्नता, ऐश्वर्य हे प्रत्येकालाच वारसाहक्काने मिळत नाही. अनेकांना कष्टाचे डोंगर उपसल्यानंतर कुठे इच्छापूर्तीचे, ध्येय गाठल्याचे समाधान मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिनदर्शिकांचा मानबिंदू कालनिर्णय! आज घराघरात केवळ दिवाणखान्यातील भिंतीवर नव्हे तर शयनगृह, कारमध्ये आणि महिलांच्या पर्समध्ये पाहायला मिळणारे कालनिर्णय सहजासहजी पोहोचलेले नाही त्यामागे साळगावकर कुटुंबीयांचे खडतर कष्ट, सुयोग्य नियोजन, संयम, हिंमत, धाडस इत्यादी अनेक बाबी आहेत. कालनिर्णयचा चढता आलेख व्यवसायात उतरु पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श, अनुकरणीय असाच आहे. या अत्यंत कठीण प्रवासाचा भावस्पर्शी आलेख श्री जयेंद्र साळगांवकर यांनी या अंकात मांडला आहे.
काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय! सारंग गोसावी यांच्या भावना आणि त्यांचे काश्मीर भागातील कार्य अत्यंत भावपूर्ण शब्दात मांडले आहे चपराक परिवाराच्या ज्येष्ठ सदस्या आणि उप संपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी!
आजच्या राजकीय स्थितीवर जळजळीत प्रकाश टाकणारा प्रवीण दवणे यांचा ‘साहेब निर्मितीचे कारखाने’ हा लेख विचारप्रवर्तक आहे, धगधगते वास्तव आहे. ‘स्वप्नविक्या’ ही ऐश्वर्य पाटेकर यांची कथा एक भयाण वास्तव प्रकट करणारी आहे. स्वप्न ही जशी नैसर्गिक प्रक्रिया आहे तशीच ती मानव निर्मितही आहे. अनेकदा मानव स्वप्नपूर्तीसाठी काहीही करायला तयार असतो तर कधीकधी अशा स्वप्नाळू मानवांना स्वप्नांच्या जगात फिरवताना त्यांचं सर्वस्व लुटणारेही आहेत. म्हणून ही कथा वाचनीय आहे. ‘प्राण पिशाच्च’ ही आगळ्यावेगळ्या विषयावरील राजीव तांबे यांची कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. सौ. सरिता कमळापूरकर यांच्या ‘भ्रम’ या कथेत अपूर्वा नावाचे पात्र आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींवर काळजाला भिडणारे भाष्य लेखिकेने अत्यंत तन्मयतेने केले आहे.
आयुष्य हा जन्म – मृत्यू या दोन थांब्यांमध्ये होणारा प्रवास! या जीवनप्रवासात ओळखीचे, अनोळखी अशी कितीतरी माणसे भेटतात. दीपक पारखी लिखित ‘अनोळखी’ ह्या कथेत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीचे अनुभव काळजाला भिडणारे आहेत. ‘ऐश्वर्य… काळीजठेव’ हा सुमंत जुवेकर यांच्या आईवडिलांच्या आठवणींना शब्दबद्ध करणारा सुमेध वडावाला यांचा लेख एका वेगळ्या विश्वात नेणारा आहे.
संजय नहार सरहद संघटनेच्या माध्यमातून काश्मीरमधील लोकांसाठी सर्वस्व पणाला लावून झटणारी एक बहुचर्चित व्यक्ती! त्यांच्या विविधांगी, समाजोपयोगी कार्याचा सखोल अभ्यास करून त्यांना शब्दस्वरूपात मांडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी यांनी ‘रचनात्मक कार्याचा दीपस्तंभ’ या लेखात केली आहे!
अनेकानेक विविध विषयांना शब्दसुमनात गुंफणाऱ्या लेखिका म्हणून सौ. सुरेखा बोऱ्हाडे यांची ओळख आहे. स्त्री-पुरुष संबंधावर लिहिणे तर सोडा परंतु बोलणे थोडेसे संकोची वाटते तिथे बोऱ्हाडे यांनी ‘स्त्री-पुरुष मैत्री आकर्षण, गरज की फॅशन?’ हा मुद्देसूद लेख लिहिला आहे. स्त्री- पुरुष मैत्रीची त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा शब्दात चर्चा केली आहे. खास करून आजच्या तरुणाईने हा लेख तर वाचलाच पाहिजे परंतु पालकांनीही वाचावा असे हे विचार आहेत.
भारतीय स्वातंत्र्य आज पंचाहत्तरीत पोहोचले आहे. या दीर्घ प्रवासातील ‘साहित्या’ चा सखोल अभ्यास प्रा. मिलिंद जोशी यांनी समर्थपणे आणि समर्पकपणे ‘मागे वळून पाहताना’ या लेखात मांडला आहे. ‘भारतीय आरोग्य व्यवस्थेचा अमृतानुभव’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख इ.स. पूर्व ७०० पासून ते आजच्या व्यवस्थेवर टाकलेला प्रकाश त्यांच्या जिज्ञासू वृत्तीची साक्ष देते. एक वेगळ्या परंतु आरोग्याशी निगडित व्यवस्थेचा परामर्श वाचकांना निश्चितच आवडेल असाच आहे.
सैन्यात जायचं या स्वप्नपूर्तीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात याचे काळीज चिरणारे वर्णन कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांच्या ‘खडतर प्रवासाची प्रेरक कथा’ ह्या लेखात वाचायला मिळते. शीर्षकात विषय स्पष्ट होत असला तरीही त्यांचा खडतर प्रवास हा भविष्यातील स्वप्नं पाहणारांसाठी प्रेरणादायी निश्चितच आहे. आजकालच्या तरुणाईला ‘यापूर्वी कुठे काम केल्याचा अनुभव आहे का?’ हा प्रश्न सतावत असतो आणि वैतागलेला प्रत्येक बेकार स्वतःला जेव्हा ‘अनुभव येण्यासाठी कुणीतरी आधी नोकरी देणे गरजेचे आहे ना? जर नोकरी कुणीच दिली नाही तर अनुभव कसा येईल?’ हा प्रश्न विचारतो तेव्हा आजच्या व्यवस्थेची भीषणता लक्षात येते. पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या नोंदींना लेखाचे वाचनीय असे स्वरूप दिले आहे. वेगवेगळ्या विषयांवरील ‘नोंदी’ हा लेख वाचायला हवा.
विविध विषयांवरील साहित्याचा दिवाळी अंक हे वेगळेपण जपणाऱ्या चपराक दिवाळी अंकात ‘कान्होपात्रा’ ही कथा भावनांना ओलावा प्राप्त करून देणारी आहे. जळीत रुग्णांच्या वॉर्डात आलेल्या एका रेड लाईट भागातील तरुणीची हृदयद्रावक कथा तुषार दामगुडे या युवा लेखकाने सशक्तपणे मांडली आहे. ज्येष्ठ संपादक यमाजी पालकर यांनी ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत कोठे?’ हा चिंतनशील लेख लिहिला आहे. विविध क्षेत्रातील भारतीय कामगिरीचे केलेले वर्णन प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी ह्यांनी आगळ्यावेगळ्या विनोदात्मक लेखन शैलीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा विनोद हसता हसता मार्मिकपणे भाष्य करणारा असतो. ‘आमचेही पाऊस विचार (मच्छरासह)’ हा लेख त्यांच्या आशयगर्भ विनोदाची झलक दाखविणारा आहे.
सण, परंपरा या विषयावर ‘ह्या ‘विषवल्ली’ वेळीच उपटून टाकायला हव्यात…’ हा सामाजिक उत्सवावर भाष्य करणारा अत्यंत स्पष्ट विचार असलेला मृणालिनी कानिटकर- जोशी यांचा लेख विचारप्रवर्तक आहे.
‘कांबळे मास्तरांचा तास…’ ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्याविषयी धीरज वाटेकर यांचा लेख उत्तम जमला आहे. या लेखातून साप्ताहिक सत्यशोधक याविषयीची माहिती मिळते.
चपराक परिवारातील ज्येष्ठ सदस्य सदानंद भणगे यांचा ‘THIS IS मात्र TOO MUCH हं!’ हा शीर्षकात वेगळेपणा दर्शविणारा लेख मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यावर इंग्रजीचे होणारे अवास्तव आक्रमण ह्यावर विचार करायला लावणारा आहे.
श्रद्धा, डोळस श्रद्धा, विकृत श्रद्धा, विज्ञानांधळेपणा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रवचनकार आणि ज्वलंत हिंदुत्ववादी विचारवंत डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे यांचा विचारप्रवर्तक लेख प्रकाशित झाला आहे यावर्षीच्या चपराक दिवाळी अंकात! अनेक प्रश्नांच्या जाळ्यात गरगरणाऱ्या प्रत्येकाने हा लेख वाचायलाच हवा.
मनाची व्यायाम शाळा, शैक्षणिक पालकत्व, कपडेलत्ते, धगधगते क्रांतिपर्व सरदार अजितसिंग, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचे योगदान, अमृतमहोत्सव आणि शेतकरी, शिक्षणाची अमृतमहोत्सवी क्रांती, महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलेची वाटचाल, आनंदाचे डोही, बिगर- भारतीय महान योगगुरू, शेख मुजिबूर रेहमान हत्या…, बॉलिवूड नावाचा ‘मिनी इंडिया’, सिद्धी, महामार्ग आणि ‘माउली’ हे लेख वाचनीय, मननीय असून अंकाचे सर्वस्पर्शीत्व, विविधता दर्शविणारे आहेत.
एकंदरीत चपराक दिवाळी अंक अत्यंत वाचनीय, संग्रही ठेवावा असा, विचारप्रवर्तक, मार्गदर्शक असा आहे. वाचक त्याचे जोरदार स्वागत करतील यात शंकाच नाही. अंकाचे संपादक, संपादकीय मंडळ, लेखक, चित्रकार आणि इतर या सर्वांचे खूप खूप अभिनंदन! शुभेच्छा!!
००००
नागेश सू. शेवाळकर, पुणे
(९४२३१३९०७१)
Reviews
There are no reviews yet.