पुस्तकाबद्दल
मराठवाड्यातील संत परंपरेचा वारसा लेखणीच्या माध्यमातून समर्थपणे चालविणार्या प्रा. डॉ. मेधाताई गोसावी-कुलकर्णी यांचा ‘अवचिता परिमळु’ हा कवितासंग्रह राजधानी दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होतोय. मेध म्हणजे यज्ञ आणि मेधा म्हणजे कुशाग्र बुद्धी! मेधाताईंच्या या संग्रहातून त्यांच्या चिंतनसाधनेचा कवितारुपी धगधगत असलेला ज्ञानयज्ञ दिसून येतो.
‘अवचिता परिमळु’ हे संत ज्ञानेश्वरांचे अद्भुतरम्य काव्य! या काव्याचा गंध आणि भाव प्रस्तुत संग्रहात उतरला आहे आणि त्यामुळेच या संग्रहाचे हे शीर्षकही सार्थ ठरले आहे. साक्षात गोपाळकृष्णच माझ्या भेटीला येतोय आणि त्यामुळे वातावरण सुगंधित झाले आहे, सर्वत्र चैतन्यमयी दरवळ पसरलाय हा माउलींना अभिप्रेत असलेला भाव, ती अनुभूती या काव्यप्रसादातून दिसून येते.
या कवितांत शब्दलालित्य तर आहेच पण मानवी भाव-भावनांचं, जगण्याचं संचित आहे. दुधाचं दही लावावं, दही घुसळून त्याचं ताक करावं, त्यातून अलगदपणे लोणी काढावं आणि त्यापासून झालेलं तुप आनंदानं सेवन करावं त्याप्रमाणे या संग्रहाचे विविध विभाग आपल्याला वेगवेगळी अनुभूती देतील. शृंगार, प्रेम, गवळणी, अभंग-आर्यापासून ते कथांना कवितारूप देण्यापर्यंत सगळं काही या कवितांत आहे.
अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळु
मी म्हणें गोपाळु, आला गे माये
तो सावळा सुंदरू, कांसे पीतांबरू
लावण्य मनोहरू, देखियेला
वाचकांची अशीच भावविभोर अवस्था हा संग्रह वाचताना होते. प्रा. मेधाताईंच्या भावी लेखन प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा!
– घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.