पुस्तकाबद्दल
वाचता आणि ऐकता येणारा दिवाळी अंक – चपराक
साहित्य चपराक मासिकाचा यंदाचा अंकही वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला आहे. यंदाच्या चपराकच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अंक प्रिंट, ऑडिओ आणि इ बुक अशा तिन्ही स्वरूपात प्रकाशित होत आहे. त्यामुळे वाचता आणि ऐकता येणारा दिवाळी अंक म्हणून या अंकाकडे पाहावे लागेल. यातील कथा, कविता, लेखांचे क्युआर कोड त्या त्या साहित्यप्रकारासोबत प्रकाशित केले असून ते स्कॅन केल्यावर चपराकच्या युट्युब चॅनेलवर हा संपूर्ण अंक वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.
कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगावकर यांनी या अंकात शेअर बाजारमध्ये मराठी माणसाचा आलेख चढताच, हा प्रेरणादायी लेख लिहिला आहे. डॉ. आशुतोश जावडेकर, डॉ. संजय मालपाणी, सदानंद भणगे, सु. ल. खुटवड आदींचे विनोदी साहित्य आहे. डॉ. वर्षा तोडमल यांनी मनाच्या शक्तिविषयी लिहिले आहे तर डॉ. न. म. जोशी यांनी माझ्या जीवनातील राजयोग या लेखात राजकपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांनी मोदी आणि शहा या जोडगोळींकडून नितीन गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्यावर सातत्याने कसा अन्याय होतोय आणि 2024 साली गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी कसे योग्य उमेदवार आहेत याबाबतचा जवळपास बारा हजार शब्दांतील सविस्तर लेख आहे.
अविनाश चिंचवडकर यांचा पुणे पण मराठी उणे हा चिंतनशील लेख आहे. नागेश शेवाळकर यांचा लावणी – भुरळ घाली मनी हा लावणीविश्वाचा आढावा घेणारा लेख आहे. श्रीराम पचिंद्रे यांनी पर्यावरणीय अणीबाणीचा लेखाजोखा मांडलाय. सुनील भातंब्रेकर यांचा देवपूजा, मानसी चिटणीस यांचा जांभूळ भूल, जे. डी. पराडकर यांचा आठला गोड झाल्या, माधवी देवळाणकर यांचा मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान, आशिष निनगुरकर यांचा परदेश शिक्षणाची वैभव गाथा, राजेंद्र देशपांडे यांचा शरीर एक जादूगार, देवीदास फुलारी यांचा मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ताराबाई परांजपे यांच्यावरील लेख, मृणालिनी कानिटकर-जोशी यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय स्त्री शिक्षण – स्त्रियांचे योगदान आणि संघर्ष, सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके यांचा उबुंटु – एक सामूहिक जीवनपद्धती, बाबासाहेब सौदागर यांचा नव्हाळीतलं निळं चांदणं, सुनील शिनखेडे यांचा रानकवी ना. धों. महानोर यांच्यावरील तो एक राजहंस असे काही वाचनीय लेख आहेत. आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि साहित्य निर्मिती या विषयाच्या माध्यमातून सुरेखा बोर्हाडे यांनी नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिलीय. संजय संत यांनी धक्का या दीर्घलेखातून सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर, पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे, गोळवलकर गुरूजी, शरद तळवलकर, कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, शांताबाई शेळके, कृष्णराव मेहेंदळे आदींचे अनेक किस्से सांगितले आहेत. अंजली कुलकर्णी यांनी जीएफ, बीएफ की शंकरराश शकू या लेखातून जुन्या-नव्या पिढीतील स्त्रियांच्या वेदना मांडल्यात. संदीप वाक्चौरे यांचा शिक्षण क्षेत्राविषयी तर दीपक राइरकर यांचा मराठी भाषेविषयीचा लेख आहे. रवींद्र कामठे यांचा हसू आणि आसू हा मानवी भावभावनांविषयीचा लेख आहे. प्रवीण दवणे यांनी मी एक संभ्रमित या लेखाद्वारे सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले आहे. समीरबापू गायकवाड, बी. एन. चौधरी, चंद्रलेखा बेलसरे, रवींद्र खंदारे, प्रल्हाद दुधाळ, मनिषा कुलकर्णी आष्टीकर, रमा परांजपे आदींच्या कथा आहेत.
सामान्य माणसांकडून पत्रकारांना कायम ट्रोल केले जात असताना आम्ही पक्षपाती आहोत का या विषयांवर काही संपादक आणि पत्रकारांनी मोकळेपणाने लिहिले आहे. मटाचे श्रीकांत बोजेवार, पुढारीचे सुनील माळी, दृकश्राव्य माध्यमाचे प्रसन्न जोशी, सागर सुरवसे, आबा माळकर आदींनी या विषयावर त्यांची मते मांडली आहेत. कविता, व्यंगचित्रे आदींची पेरणीही या अंकात आहेच. घनश्याम पाटील यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणारा चपराकचा हा दणदणीत अंक दसर्याच्या मुहूर्तावर वाचकांच्या भेटीस येत आहे.
Reviews
There are no reviews yet.