पुस्तकाबद्दल
नाटकांच्या दौऱ्यासाठी राज्यभर फिरावे लागते. यामुळे फारसा मोकळा वेळ मिळतच नाही. प्रवासादरम्यान सारा शीण विसरण्यासाठी काही वाचायचे म्हटले तर मी कोकणातील माझे लेखक मित्र जे. डी. पराडकर यांचे लेखन आवर्जून वाचतो. कोकणच्या निसर्गाची भुरळ सर्वांनाच पडत असते. मनात असूनही निवांतपणे कोकणात फिरणे शक्य होत नाही. अशावेळी जे. डी. पराडकर यांचे लेख वाचल्यानंतर कोकणची सफर केल्याचा आनंद मिळतो. कोकणचा निसर्ग, पर्यटन, पर्यावरण आणि कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वे यावर जे. डी. भरभरून लिहित असतात. लेखनातील त्यांचे सातत्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
पुण्याच्या ‘चपराक प्रकाशन’ने जे. डी. पराडकर यांचे ‘साद निसर्गाची’ हे पुस्तक गतवर्षी प्रकाशित केले. निसर्गविषयक या पुस्तकाला वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभला. १५ मे २०२३ रोजी ‘चपराक प्रकाशन’ जे. डी. पराडकर यांची ‘कसबा डायरी’ व ‘बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा’ ही दोन पुस्तके प्रकाशित करत आहे. २५ मे रोजी ‘असं जगावं कधीतरी’ हे ‘चपराक’तर्फे एकाच महिन्यात येणारं त्यांचं तिसरं पुस्तक आहे. एकाच महिन्यात तब्बल तीन पुस्तकांचे प्रकाशन होणाऱ्या लेखक जे. डी. पराडकर यांचे तसेच ‘चपराक प्रकाशन’चे संपादक श्री. घनश्याम पाटील यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. ‘असं जगावं कधीतरी’ या पुस्तकातील व्यक्तिमत्त्वे शून्यातून विश्व उभारत कशी कर्तृत्ववान बनली तसेच या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे बारकावे टिपण्यात जे. डी. पराडकर यशस्वी झाल्याचे दिसते. या पुस्तकातील प्रत्येक कथा वाचनीय असल्याने यासह सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल याची मला खातरी आहे.
खूप शुभेच्छा!
प्रशांत दामले
अभिनेता
Reviews
There are no reviews yet.